कुणी म्हणतं प्रेम, एक गुलाब आहे
जे सुंदरतेचे जगमान्य प्रमाण असते
कुणी म्हणतं, प्रेम एक अभ्रक आहे
जे सगळ्याच नात्यांत जन्म घेऊ शकते.
कुणी म्हणतं प्रेम, हे आयुष्य समृद्धीचे
आवश्यक असे अमृतपाणी
मी म्हणतो प्रेम, एक अमूर्त जळणं
वेड्यावाणी, वेड्यावाणी .
प्रेम म्हणजे झोकून देणं
प्रेम म्हणजे आर्त हाक
प्रेम म्हणजे दुःखी होणं
प्रेम म्हणजे सुंदरसा परिपाक.
प्रेम म्हणजे हिण मिळवून
बनलेले एक अलंकारित सुवर्ण
प्रेम म्हणजे उगमापासून दूर धावणाऱ्या
नदीचं आवेशाने स्वसमर्पण
कधी डोळे ओले करणारी वेदना
कधी थुईथुई नाचणारा उल्हास
एक हुरहुरणारी संवेदना
क्षणिक इंद्रधनूतला एक आभास
जेंव्हा रात्री एकाकी वाटतात
आणि वाटा न संपणाऱ्या भासतात
आणि प्रेम हे नशिबवानासाठी आहे
अशा शंका मनात डोकावतात
तेंव्हा एकच गोष्ट लक्षात ठेव
धरतीच्या पोटातून एक बीज उगवेल
आणि त्या नाजूक रोपट्यावर
एक गुलाब उमलेल….
विवेक साळुंके, पुणे
जून २०२3
कविता आवडल्यास ‘Like‘ करा , ‘Share‘ करा आणि ‘Comment‘ करा
Copyright @Vivek Salunke: The copyrights of this content belongs to me. You should take my prior written permission before reproducing this content in any form in any media in any part of the world