Tag Archives: Cessna

आकाशी झेप घे रे …

अमेरिकेत नोकरी करीत असताना माझा एक अवलिया गोरा मित्र होता. एरिक नाव आहे त्याचं. त्याची आणि माझी वेव्हलेंग्थ चांगली जुळली. इतर अमेरिकन गोरे, परिचित झाले होते पण मित्र ह्या श्रेणीत बसत नव्हते. तर हा एरीक एक संगीत ह्या विषयाचा पदवीधर होता. पण तो आमच्या कंपनीत प्रोग्रामर म्हणून काम करत होता. अमेरिकेनं लोकांचं हे एक वैशिष्ट आहे, ते वेगळ्याच विषयाचे पदवीधर असतात पण भलत्याच फिल्ड मध्ये नोकरी करतात. एरिकची बायको हि जपानी आहे आणि ते दोघे कॉलेज मध्ये असताना भेटले.ती एक उत्कृष्ट पियानो वादक आहे तर एरीक व्हायोलिन वादक आहे. तर ते दोघे कुठे खाजगी कॉन्सर्ट असले कि त्यात भाग घेतात. त्यामुळे त्यांना संगीताचं शिक्षण चालू राहतं आणि अतिरिक्त उत्पन्न पण मिळतं. एरिकची बायको खाजगी शिकवण्या घेत असते. ह्या एरिकनेच मला पाश्चात्य संगीताची आवड लावली. तो मला Wagnar , Bethoven , Mozart ह्यांच्या ध्वनी मुद्रिका ऐकायला देत असे. एरीक कडे त्यांचा मोठा संग्रह होता. एरीक आमच्या ग्रुप मध्ये एकमेव अमेरिकन होता जो जेवणाचा डबा आणायचा. आम्ही एकत्र जेवायला बसायचो. मला एरिकचा डबा उघडला कि बघायला आवडायचा. त्याची जपानी बायको सुंदर रचून जेवण द्यायची. जशी रांगोळी घातल्या सारखी. त्यात सुशी वगैरे पदार्थ असायचे.

तर हा एरीक पायलट बनण्याचं ट्रेनिंग घेत होता आणि उत्तीर्ण पण झाला होता. ट्रेनी पायलटचा परवाना त्याला मिळाला होता. बहुतेक शनिवार, रविवार तो ट्रेनिंग घेण्यासाठी जात असेल. त्याने मला एकदा विचारले “तुला माझ्याबरोबर विमानात बसून उड्डाण करायला आवडेल का?”. मी त्याला पुढचा मागचा विचार न करता होकार दिला. कोणतंही साहस म्हटलं कि माझ्या अंगात उत्साह संचारतो. तर आम्ही एक शनिवार उड्डाणासाठी ठरवला. अर्थात मी अलकाला घरी आल्यानंतर सांगितलं. ऑफिस मध्ये नंतर सगळ्या ग्रुपला बातमी पोचली. एकाने मला विचारले “तू वेडा आहेस कि काय, तुझ्या कडे जीवन विमा आहे कि नाही ह्याची खात्री कर” वगैरे वगैरे. काहींना चेष्टा करायची होती तर काहींना खरोखर काळजी वाटत होती.काळजी करण्याचं कारणही खरंच होतं. हा एरिक बऱ्याच वेळा पॅनिक व्हायचा. आमची कंपनी होम मॉर्टगेज मध्ये होती. सगळं काम कॉम्पुटर वर चालायचं. शंभर टक्के ऑटोमेशन होतं. काही वेळा मर्फीच्या नियमाप्रमाणे (Anything that can go wrong will go wrong ) प्रोग्रॅम बंद पडायचे. असं झालं कि धंद्यावर परिणाम व्हायचा. असा व्यत्यय प्रलंबित असला तर आमचे गिर्हाईक आमच्या प्रतिस्पर्धकाकडे जायचे. असे झाले कि एरिकने पॅनिक बटन दाबलेच म्हणून समजायचे. तो टेन्स होऊन इकडे तिकडे पळत सुटायचा. त्याचा तणाव तो इतरांना ट्रान्स्फर करायचा. एरिकचा हा स्वभाव ऑफिस मध्ये सुपरिचित होता. असो.
तर तो शनिवार उगवला, मी आपला उत्साहित होतो. आम्ही दुपारी तीनच्या सुमारास घरून निघणार होतो. एरिकचा मला सकाळी सकाळीच फोन आला. तो मला विचारात होता ” Mind if I take a rain check on the flight?”. मला रेन चेकचा अर्थ काही माहित नव्हता. मला वाटले कि आज पाऊस पडण्याची शक्यता असेल म्हणून आज नको म्हणत असेल. मी त्याला म्हणालो “अरे मित्रा, बाहेर तर चांगलं ऊन पडलंय, तू पावसाचं काय बोलावयास लागला?”. असा संवाद बराच वेळ चालल्यावर तो म्हणाला कि आजचा प्रोग्रॅम आपण नंतर कधीतरी करू.  असे बरेच वाक्यप्रयोग अमेरिकेत असताना शिकायला मिळाले. सोमवारी ऑफिस मध्ये गेल्यावर मी त्याला भेटलो तर त्यांनी मला “रेन चेकचा” अर्थ सांगितला.

काही दिवसानंतर एका वीकएंडला शेवटी तो दिवस उगवला. एरीकच्या कारमध्ये बसून आम्ही गेलो. त्याच्या कडे एक लाख मैल चालवलेली दोन दरवाजांची फॉक्स वॅगन Pasat कार होती. त्याच्या कडे एक कुत्री होती. त्या कुत्रीचे केस सगळीकडे पसरलेले असायचे. मागच्या सीटवर पेपरची रद्दी पडलेली असायची. त्याला मुलबाळ नव्हतं त्यामुळे तो अजागळासारखा राहायचा. त्या गाडीचा पण एक किस्सा त्याने आम्हाला सांगितला होता. ती गाडी विकून त्याला नवीन गाडी घ्यायची होती. अमेरिकेत अशी जुनी गाडी देखील तिथले विध्यार्थी विकत घेतात. पण त्याची गाडी काही विकली जाईना. म्हणून त्यांनी अमेरिकेतल्या युनाइटेड वे नावाच्या NGO ला देणगी म्हणून देण्या साठी फोन केला. त्यांनी कार बद्दलची माहिती विचारली. कारचं मायलेज ऐकून पलीकडची व्यक्ती म्हणाली, आम्ही कार स्वीकारू पण एका अटीवर. एरिकला कळेना कि हि लोकं अट आणि कसली घालतायेत. पलीकडची व्यक्ती म्हणाली, कार टो (tow ) करायचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील!!

आम्ही ग्विनेट काऊंटी विमान तळावर गेलो. तिथे एरिकने त्याच्या कोचशी माझी ओळख करून दिली. आम्ही सेसना कंपनीच्या दोन सीटर विमानात बसलो. एरिकने मला हेडफोन घालण्यास सांगितले. आम्हा दोघातील संभाषण आता ह्या हेडफोन द्वारेच करायचं होतं. आम्ही त्या छोट्या एअर पोर्टवर टेक ऑफ साठी सज्ज झालो. कंट्रोल टॉवर वरून निर्देशल्या प्रमाणे आम्ही धाव पट्टीवरून अति वेगाने

atlanta_skyline
अटलांटा डाउनटाऊन

निघालो आणि काही वेळातच हवेत (ऐरबॉर्न) उड्डाण केले. सेसना हे एक लहान विमान असल्यामुळे, विमान छोट्या ढगातून जरी गेले तरी विमान वर खाली होते. प्रवासी विमानात आपण खूप मोठ्या टेर्बलन्स मधून गेलो तरच आपल्याला धक्के जाणवतात. तसेच सेसना विमानातून खाली पाहिल्यावर भीती वाटते. एरीक मला खालच्या प्रदेशाबद्दल सांगत होता. आम्ही अटलांटा डाउन टाऊन वरून जायचे ठरवले. हि ९/११ पूर्वीची गोष्ट आहे. त्याकाळी कुठलेच प्रतिबंध नसायचे. आता डाउनटाऊन वरून जाण्यास मनाई असेल. आम्ही डाउनटाऊन मधल्या गगन चुंबी इमारतीवरून जात होतो. तो एक अतिशय रोमहर्षक अनुभव होता. आपण रस्त्यावरून डाउनटाऊन मध्ये फिरत असतो आपण खूप खुजे असल्याचा अनुभव त्यावेळी येतो. परंतु जेंव्हा आपण २-3 हजार फुटांवरून तेच दृश्य बघत असतो तो अनुभव “I am on टॉप” असाच असतो. आपण एकाद्या हिमशिखरावर चढाई केल्या नंतर खाली बघतो त्यावेळी आपल्याला जसं वाटतं तसाच अनुभव असतो तो.

आमच्या कंपनीचं मुख्यालय अटलांटा डाउनटाऊन मधेच आहे. एरिकने ती बिल्डिंग मला दाखवली. आम्ही CNN , ब्रेव्हस (अटलांटाची बेसबॉल टीम) चे टर्नर स्टेडियम पहिले . डाउनटाऊन वरून २-३ फेऱ्या मारून आम्ही निघालो. आता एरीक मला म्हणाला कि आपण “टच आणि गो” करूयात. हि काय भानगड आहे मला माहित नव्हते. आपण काय काय करू ह्याची पूर्वकल्पना मला नसल्यामुळे सगळेच नवीन होते. मी म्हणालो चालेल. आम्ही फलटण किंवा फुल्टन(Fulton ) काऊंटी एरपोर्टच्या दिशेने निघालो. तो तिथल्या कंट्रोल टॉवरशी संवाद साधत होता. मला तेही ऐकू येत होते. कंट्रोल टॉवर वरून इतर विमानांना देण्यात येणारी सूचना पण आपल्याला ऐकू येत असते. आम्ही फलटण काऊंटी एरपोर्टच्या धावपट्टीवर उतरलो आणि वेग कमी न करता टेक ऑफ करण्यासाठी पुन्हा वेग वाढवत निघालो. ह्याला Touch and Go म्हणतात असे एरिकने मला सांगितले. आम्ही परत हळू हळू उंची गाठू लागलो. सेसना विमान तेरा हजार फूट पर्यंत उडू शकते. त्याला एकच इंजिन असते. एक इंजिन निकामी झालं तर त्याला ग्लायड करून रस्त्यावर उतरवता येते. एरिकला त्याची कल्पना होती कि नाही माहिती नाही. कदाचित पायलट ट्रेनिंगचा तो पार्ट असेलही. आम्ही आता लेक लेनियरच्या दिशेने निघालो होतो. हेडफोन वरून एक पायलट कंट्रोल टॉवरला विचारत होता, “मी कुठे आहे मला माहित नाही, कृपया मला गाईड करा”. हे एरिकने ऐकले व तो म्हणाला “OMG , this idiot has lost his way, please look around if you see a plane around you”. मला माहिती नव्हते कि आकाशात पण असे पायलट असतात कि ज्यांना डिरेक्शन हवी असते. आपण भारतात गाडी रस्त्याच्या साईडला घेऊन गावातल्या माणसाला रस्ता विचारू शकतो, पण अमेरिकेतील रस्त्यावर पण तसे करता येत नाही तर हवेत उडत असताना “काय करायचं” हे विचारायची पाळी येऊ शकते ह्याचा विचार देखील करवत नव्हता. एरीक पॅनिक झाला होता पण स्वतःच विमान नीट उडवेल ह्याची खात्री होती. आता तो दिशा हरवलेला पायलट जोरात येऊन

Aerial_Lanier
लेक लेनियर

आम्हाला धडकेल कि काय अशी शंका मनात येऊन गेली. कंट्रोल टॉवरची व्यक्ती त्या पायलटला काही प्रश्न विचारून खात्री करून घेत होती कि तो नक्की कुठे आहे, किती उंचीवरून चालला आहे. एक गोष्ट आम्हाला कळली कि तो आमच्या विमानापेक्षा कमी अल्टीट्युड वरुन विमान उडवीत होता. त्याला कंट्रोल टॉवरने योग्य ती सूचना केली आणि आमची सुटका झाली. लेक लेनिअर हे जॉर्जियाच्या उत्तरेकडे असलेले एक जलाशय आहे. चट्टाहूची नदीवर बांधलेल्या बुफर्ड डॅम मुळे झालेलं हे एक विस्तीर्ण जलाशय आहे. ते ३८ हजार एकर विस्तारलेलं आहे. आम्ही त्या जलाशयावरून फेऱ्या घेतल्या. अतिशय सुंदर असं दृश्य होतं ते. मी कधीही कल्पना केली नव्हती कि मी एका छोट्या विमानातून एका अमेरिकन मित्रा बरोबर आकाशात मुक्त पणे विहंग करिन. मला हे सगळं स्वप्नवत वाटतं होतं. विमानातल्या कॉकपीट विषयी मी फारशी माहिती घेतली नाही. विमान बाहेरची शोभा बघण्यातच मी मग्न झालो होतो. क्षणभर मी सगळं विसरून गेलो होतो. आम्ही परत ग्विनेट काऊंटी विमान तळाच्या दिशेने निघालो. एरिकने व्यावसायिक पायलट करतात तसे लँडिंग केलं. आमची आकाश भरारी अगदी छान झाली होती. आज वीस बावीस वर्षांपूर्वीची घटना जशीच्या तशी आठवली.

विवेक साळुंके, पुणे
फेब्रुवारी 2019

लेख आवडल्यास ‘Like‘ करा , ‘Share‘ करा आणि ‘Comment‘ करा